अंबाजोगाई : येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात पाठीमागील दारातून प्रवेश करू न देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला महिला आणि तिच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
रामकिसन राजाभाऊ सोमवंशी हे श्री योगेश्वरी देवी मंदिरात सुरक्षारक्षक आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता उषा गोविंद यादव, अक्षय गोविंद यादव आणि विशाल गोविंद यादव (सर्व रा. भटगल्ली, अंबाजोगाई) हे तिघे मंदिर परिसरात आले. त्यांच्याकडील यजमानाला मंदिराच्या पाठीमागील दरवाजातून आत प्रवेश न दिल्याच्या कारणावरून त्या तिघांनी रामकिसन सोमवंशी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.