: येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना सर्व सोयीसुविधा व्यवस्थित मिळाव्यात, यासाठी रोज एका तालुकास्तरीय अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. येथे रुग्णांना भोजन, स्वच्छतालय, शुद्ध पाणी, निवास, उपचार आदी सुविधा व्यवस्थित मिळतात की नाही, याची नियमित तपासणी व पाहणी नियुक्त केलेले अधिकारी करतील.
सोमवारी नायब तहसीलदार प्रकाश गोपड, मंगळवारी तहसीलदार वंदना शिडोळकर, बुधवारी गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे, गुरुवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, शुक्रवारी जलसंपदा विभागाचे उपअभियंता बी.जी. गुट्टे, शनिवारी सहायक निबंधक एस.डी. नेहरकर, रविवारी तालुका कृषी अधिकारी एस.डी. शिनगारे यांच्यावर जबाबदारी निश्चित केली असून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे तसेच जर या कामात दिरंगाई केली, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोगप्रतिबंधात्मक कायद्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत या आदेशात देण्यात आले आहेत.