बीड : लोक गर्दी करीत आहेत. आयसोलेशन वॉर्डपर्यंत जात आहेत. मदत केंद्राबाहेरही रांगा लावून गर्दी करीत आहेत. तुम्ही करता काय? ही वाहने काढा आणि गर्दी कमी करा. सुरक्षा व्यवस्थित सांभाळा. अन्यथा कर्तव्यावर येऊ नका, असे म्हणत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी सुरक्षा रक्षकांना चांगलेच सुनावले. शनिवारी दुपारी तासभर त्यांनी पार्किंगमध्ये थांबून सर्व आढावा घेत सूचना केल्या.
जिल्हा रुग्णालयात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची गर्दी होत आहे. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक येत आहेत. तसेच कोरोना चाचणी आणि चाचणी केलेला अहवाल घेण्यासाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शनिवारी दुपारीही अशीच परिस्थिती दिसली. लोकांनी कोरोना वॉर्डच्या मुख्य गेटपर्यंत दुचाकी पार्क केल्या होत्या. हाच धागा पकडून शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांनी सगळीकडे पाहणी केली. सुरक्षा रक्षकांकडून नियोजन केले जात नसल्याचे दिसताच ते संतापले. त्यांनी सर्व पार्किंगचा आढावा घेत रक्षकांना चांगलेच सुनावले. रस्त्यात वाहने उभी करू देऊ नका. लोक गर्दी करीत असतील तर त्यांना शिस्त लावा. सोशल डिस्टन्स ठेवण्यास आवाहन करा. हातात काठी आणि शिट्टी राहूद्या. कर्तव्यात हलगर्जी करू नका, अन्यथा तुमच्यावरच कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही डॉ. गित्ते यांनी रक्षकांना दिला. त्यामुळे त्यांची चांगलीच धावपळ झाली.
टेबल वाढवा, प्रमाणपत्र द्या
कोरोना चाचणी केलेला अहवाल घेण्यासाठी मदत केंद्राबाहेर व्यापारी, नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. यावर काही लोकांनी ताटकळत उभे रहावे लागत असल्याच्या तक्रारी केल्या. यावर डॉ. गित्ते यांनी आणखी टेबल वाढवून प्रमाणपत्र लवकर देण्याच्या सूचना केल्या.
कोट
पार्किंगच्या जागेची थोडी अडचण आहे. परंतु आहे त्या जागतेही आम्ही चांगले नियोजन करू. सुरक्षा रक्षकांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनीही सहकार्य करावे.
डाॅ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
===Photopath===
200321\202_bed_1_20032021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात आढावा घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते.