गंगामसला : माजलगाव तालुक्यातील गंगामसला ग्रामपंचायत ११ सदस्यांची असून सदरील ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असावे, यासाठी प्रत्येक जण स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावत आहे. सदर निवडणुकीत दुरंगी लढत होत असून ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. ऐन हिवाळ्यात गावगाड्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. इतर पॅनलपेक्षा आपला पॅनल कसा मजबूत असेल, यासाठी पॅनलप्रमुख रणनीती आखताना दिसत आहेत.
मागील पंचवार्षिकमध्ये निवडणुकीपूर्वी आरक्षण सुटल्याने सरपंच पदाचा उमेदवार पॅनलमधील इतर उमेदवारांनादेखील रसद पुरवीत होता. मात्र, या निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण नंतर काढण्यात येणार असल्याने इच्छुकांनी पॅनलसाठी खर्च करण्यासाठी हात आखडता घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पूर्वी काढलेले आरक्षण रद्द झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागलेल्या भावी सरपंचाचा चांगलाच हिरमोड झाला. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’चे चित्र आहे. सर्व इच्छुक पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवर्गासाठी आता चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी इच्छुकही आपल्या मतांचे समीकरण जुळवण्यात व्यस्त झाले आहेत. आपल्याला किती मत पडतील आणि निवडून येण्यासाठी किती मते लागतील, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाऊबंदासह मित्रमंडळ व नातेवाइकांची मते मोजली जात आहेत.
यंदा होणा-या निवडणुकीत मातब्बर पुढा-यांसमोर तरुणांचे आव्हान असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. मतदार कुणाला कौल देणार, याचा निर्णय निकालावर अवलंबून आहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बरांचा कस लागणार आहे. गाव पातळीवर जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.