बीड : केंद्र शासनाच्या कायाकल्प या कार्यक्रमांत जिल्ह्यातील ३४ आरोग्य संस्था पात्र ठरल्या आहेत. यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १० ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयांचा समावेश आहे. सध्या याची जिल्हास्तरावरून तपासणी सुरू आहे.
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत केंद्र शासनाकडून कायाकल्प हा कार्यक्रम राबविला जातो. यात आरोग्य संस्थांची गुणवत्ता तपासली जाते. ज्या आरोग्य संस्थांनी स्वता:ची गुणवत्ता तपासून त्यात ७० टक्केपेक्षा जास्त गुण घेतले आहेत, अशांची या कार्यक्रमासाठी निवड झाली होती. गतवर्षी ४५ आरोग्य केंद्र सहभागी होऊन १८ आरोग्य केंद्र पात्र ठरले होते. यावर्षीही ४५ आरोग्य केंद्र सहभागी झाले असून २४ केंद्र पात्र ठरले आहेत. तर जिल्हा शल्य चिकित्सकांकडील १५ संस्था सहभागी झाल्या होत्या, पैकी १० पात्र ठरल्या आहेत. ग्रामीण भागातील गुणवत्ता तपासणीचे काम सध्या सुरू आहे. तर शहरांतील तपासणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील लोक आहेत. यावर्षीही जास्तीत जास्त संस्था उत्तीर्ण होतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा समन्वयक म्हणून डॉ.संजिवणी गव्हाणे-कदम काम पहात आहेत.
स्वच्छतेवर विशेष भर
हा कार्यक्रम स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविला जातो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. कागदपत्रांची मांडणी, उपचार, समुपदेशन, संवाद यावर जास्त लक्ष केंद्रीत केले जात नाही. ज्या आरोग्य केंद्रांच्या इमारती नवीन आहेत, अशांनी यात सहभाग घेतल्याचे दिसून येते.
कोट
यावर्षी ६० संस्था सहभागी झाल्या होत्या. पैकी शहरातील १० तर ग्रामीण मधील २४ संस्था पात्र ठरल्या आहेत. आरोग्य केंद्रांची तपासणी सध्या सुरू आहे. ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयांची लवकरच सुरू होईल्. याचा निकाल मार्च अखेरपर्यंत येईल.
डॉ.संजिवनी गव्हाणे-कदम
समन्वयक, जिल्हा गुणवत्ता अश्वासन कार्यक्रम, बीड