वडवणी : तालुक्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट १ कोटी ५० लाख रुपये निश्चित करण्यात आले असून, त्या तुलनेत फेब्रुवारीअखेर १ कोटी ३५ लाख ६१ हजार रुपये ( ७९ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. तालुकाअंतर्गत १५ किमी बीड - परळी रेल्वेचे काम चालू असून, शहराच्या आजुबाजुला खडीच्या एकूण ५ क्रशर असून त्यांच्याकडून ही वसुली करण्यात आली.
तालुक्यातील ग्रामीण भागात व शहराच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन होत आहे. डोंगराळ भाग असून, तलावही मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवसेंदिवस तलावातून मुरूम काढला जात आहे. ग्रामीण भागात विविध योजनांतून होणाऱ्या रस्त्याच्या कामातून ही गौण खनिज वसुली मोठ्या प्रमाणावर होत आहे. शासनाच्या नियमांचे नाममात्र महसूल शुल्क भरले जाते. मात्र, कायद्याचे उल्लंघन करून खदानीतून दगड, खडी दिवस रात्र उत्खनन करण्याचा सपाटा लावला जात आहे. मात्र, गौण खनिज स्वामीत्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीपोटी ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. दगड वाळू, गिट्टी, मुरूम व माती इत्यादी गौण खनिजाचे स्वामीत्वधन शुल्क आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात दंडात्मक कारवाईतून २०२० - २१ या वर्षात १ कोटी ५० लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट खनिकर्म विभागाला देण्यात आले आहे. फेब्रुवारी २१ अखेर १ कोटी ३६ लाख ६१ हजार रुपये गौण खनिज वसुली करण्यात आली आहे. त्यामध्ये गौण खनिजाच्या स्वामीत्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि गौण खनिजाचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीपोटी दंडात्मक कारवाईतून वसूल करण्यात आलेल्या रकमेचा समावेश आहे. ही माहिती तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रकाश शिरसेवाड, अव्वल कारकून महसूलचे रवींद्र शहाणे, महसूल सहाय्यक प्रकाश निर्मळ यांनी दिली.
याबाबत तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की, गौण खनिज महसूल वसुली उद्दिष्टाच्या तुलनेत फेब्रुवारी अखेरपर्यंत उद्दिष्ट जवळपास ७९ टक्के वसूल करण्यात आले असून, उर्वरित वसुली मार्चअखेर पूर्ण केली जाईल.