बीड : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे (इस्कॉन) येथील श्री श्री राधा गोविंद मंदिरात गीता तुलादान कार्यक्रम घेण्यात आला.
सावता माळी चौकातील राधा गोविंद मंदिरात २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत गीता तुलादान यज्ञ ,भगवद्गीतेवर गीता महात्म्य प्रवचन व संपूर्ण भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. श्रीमान संत दास प्रभू यांच्याद्वारे पद्मपुराण या ग्रंथातून भगवद्गीतेच्या महात्म्यावर विशेष प्रबोधन व भगवद्गीतेवर आधारित गीता दान यज्ञ करण्यात आला. मोक्षदा एकादशी निमित्त २५ डिसेंबर रोजी पहाटेपासून मंदिरात मंगल आरती ,सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत भगवद्गीतेच्या संपूर्ण अठरा अध्यायांचे पठण करण्यात आले.
दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत गीता दान यज्ञ करण्यात आला. गीता यज्ञाचे पुरोहित अनंत गोविंद प्रभू व श्रीमान कृष्ण नामप्रभू होते. त्याचबरोबर भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाचे तुलादान याठिकाणी करण्यात आले. महाप्रसादानंतर सांगता झाली. भगवद्गीता ग्रंथाचे वितरण नारायण गड व व इतर ठिकाणी करण्यात आले. कार्यक्रमासाठी मंदिराचे व्यवस्थापक अध्यक्ष श्रीमान विठ्ठल आनंद दास, कृष्ण नामदास ,यादवेंद्र दास, साधूकृपा दास ,श्री नरहरी दास, मत्स्यावतार दास व राधा गोविंद मंदिराचे व्यवस्थापन समितीने योगदान दिले.