कडा (ता. आष्टी, जि. बीड ) : घुबड दिसले की त्याच्याशी निगडित अंधश्रद्धेमुळे अनेकांना भीती वाटते. घुबडाचे भीतीदायक मोठे डोळे बघूनही अनेक जण घाबरतात. काही ठिकाणी शुभ, तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. कधी कधी भोंदूगिरी व जादूटोणाच्या नावाखाली घुबडाची शिकार केली जाते. अशा अनेक कारणांमुळे घुबड दुर्मीळ होत चालले असून निसर्गातून कायमचेच नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. हे दुर्मीळ गव्हाणी घुबड कडा येथील नगर- बीड रोडलगत चाळीस बंगल्याशेजारी एका झुडुपात वेदनेने तडफड करीत दोरीत अडकले होते.
ही माहिती येथील पक्षीमित्र नितीन आळकुटे यांना समजताच त्यांनी त्या घुबडाला सुखरूप बाहेर काढले. त्याला व्यवस्थित उडता येत नसल्याने सुरक्षित जागेत ठेवून आवश्यक प्रथमोपचार करून चारा, पाणी दिल्यानंतर पंखात बळ येताच घुबडाला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले. निसर्गचक्र सुरळीत चालण्यासाठी घुबड या पक्षीची भूमिका महत्त्वाची आहे, असे दुर्मीळ पक्षी संकटावस्थेत दिसल्यास त्यांना मदत करा, वनविभाग अथवा पक्षीमित्रांना कळवा, असे आवाहन नितीन आळकुटे यांनी केले.