पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी राबविण्यात आली. या माध्यमातून ९२ टक्के लसीकरण पूर्ण झाले. तरीही जे बालक या डोसापासून वंचित राहिले आहेत. त्यांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजण्यात येत आहेत. कोणीही वंचित राहू नये याची दक्षता आरोग्य विभाग घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी दिली.
राजकीय हालचाली
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या गावांमध्ये आता सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. संख्याबळ उपलब्ध झाले. मात्र,आरक्षण कोणाला पडणार? याचे आखाडे लढवून राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे झाले तर असे करणार? अशा क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. एकंदरीत आरक्षण जाहीर झाल्यानंतरच या सर्व घडामोडी होणार आहेत.
नो मास्क नो एंट्री
अंबाजोगाई - विना मास्क प्रवाशांनाही अॅटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते. मात्र, आता बेफिकीरी वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने असतानाही पुन्हा नो मास्क नो एंट्री ही मोहीम सुरू करून ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.
कमी दाबाने वीजपुरवठा, शेतकरी त्रस्त
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.