वडवणी : भारतातील एकमेव राजा हरिश्चंद्राचे मंदिर असलेले हरिश्चंद्र पिंपरी तीर्थस्थळावरील यावर्षीचा महाशिवरात्र महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याची माहिती महंत भगवानबाबा राजपूत यांनी दिली.
सत्यवादी न्यायनिष्ठ राजा म्हणून जगभरात ख्याती असलेले राजा हरिश्चंद्राचे भारतातील एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील वडवणी जवळील राजा हरिश्चंद्र पिंपरी येथे आहे. द्वापार युगात भारत देशाचे राजे हरिश्चंद्र यांनी ॠषी विश्वामित्राला स्वप्नात राज्य दान दिलेले ते ठिकाण म्हणजे आजचे राजा हरिश्चंद्र पिंपरी अशी या ठिकाणाची ख्याती आहे. येथे मागील अनेक वर्षापासून महाशिवरात्र महोत्सव सुरू आहे. संत भगवान बाबा व भिमसिंह बाबा यांनी या महोत्सवाची ख्याती अधिकच वाढवली. सध्या भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री आणि राजा हरिश्चंद्र तिर्थस्थळाचे महंत भगवानबाबा राजपूत यांच्या अधिपत्याखाली महाशिवरात्र महोत्सव दरवर्षी मोठ्या थाटाने पार पडतो. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावत असतात. आठ दिवसीय महाशिवरात्र महोत्सवात मोठ्या प्रमाणात अन्नदान होऊन नामांकित कीर्तनकारांची कीर्तने ऐकायला मिळतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा सोहळा रद्द करत असल्याचे जाहीर करून प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे कळविल्याचे भगवान बाबा राजपूत म्हणाले.