लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मागील एक महिन्यात कापसाची खरेदी करण्यात आली असून, आतापर्यंत ७० कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी ९ जिनींगच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भारत शेजुळ यांनी दिली.
माजलगाव तालुका हा मराठवाड्यात कापसाचे भांडार म्हणून ओळखला जातो. या तालुक्याच्या क्षेत्रफळापैकी पंचवीस ते तीस टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होते. चालू हंगामात सुरुवातीपासून चांगला पाऊस झाल्याने कापसाचे पीक जोमात होते. परंतु, परतीच्या पावसाने जोर लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे कापसाची झाडे होऊन एक-दोन वेचण्या होताच शेतकऱ्यांनी कापूस मोडला. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. माजलगाव बाजार समितीच्या माध्यमातून यावर्षी ३ डिसेंबर रोजी कापसाची खरेदी सुरु करण्यात आली. काही दिवस केवळ ४ जिनींगवर कापसाची खरेदी करण्यात येत होती. परंतु, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने आणखी जिनींग सुरू कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी आणखी पाच जिनींगवर कापसाची खरेदी करण्यात आल्याने दहा हजार शेतकऱ्यांपैकी ८ हजार ५०० शेतकऱ्यांची मापे झाली आहेत.
मागील एका महिन्यात या जिनींगवर १ लाख ४१ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामुळे ७० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यांच्या कापसाला कमीतकमी ५,३६० तर जास्तीत जास्त ५ हजार ७२५ रूपये भाव मिळाला असल्याची माहिती सभापती भारत शेजुळ व सचिव हरिभाऊ सवने यांनी दिली.
माजलगाव तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांनी कापसाची नोंद केली होती. त्यापैकी ४ जानेवारीपर्यंत आठ हजार पाचशे शेतकऱ्यांची मापे झाली होती. आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची मापे एका आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन नोंद केलेल्या कापसाची मापे पूर्ण झाल्याने आता ऑफलाईन कापसाची खरेदी होण्याची शक्यता आहे. गतवर्षी कापसाचे उत्पन्न जास्त झाल्याने पावसाळ्यापर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी संक्रांतीलाच शेतकऱ्यांची मापे होण्याची चिन्हे आहेत.