दीपक नाईकवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : अतिवृष्टीमुळे झालेल्या ३३ टक्केपेक्षा जास्त शेती पिकांच्या नुकसानापोटी शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केल्यानंतर या अनुदानावर डल्ला मारण्यासाठी माळेगाव सजाच्या तलाठ्यांनी सोनीजवळा येथील माजी सरपंचासह २२ शेतकऱ्यांची पुरवणी यादी तहसील कार्यालयाला देत १,७०० ऐवजी ४,२०० रुपयांप्रमाणे अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माळेगाव सजाच्या तलाठ्यांसह मंडल अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तालुक्यातील अनेक गावात अनुदानाच्या यादीत गैरव्यवहार झाल्याची चर्चा होत असून, बोगस शेतकऱ्यांच्या नावे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासन आता कोणती कारवाई करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केज तालुक्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानाचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले होते. माळेगाव सजाच्या तलाठी वर्षा देशमुख यांनी सोनीजवळा येथील शेतकऱ्यांच्या नावांची पुरवणी यादी तहसील कार्यालयाला सादर केली. सोनीजवळा येथील शेतकरी सुर्डी येथील असल्याचे दाखवत अशोक गायकवाड - ४,२५०, उतरेश्वर गायकवाड - ३,७००, काशीनाथ गायकवाड - ४,१००, गंगूबाई गायकवाड - ३,५००, सोनीजवळ्याच्या माजी सरपंच गंगा मुकुंद गायकवाड - ३,२५०, गोविंद गायकवाड - ३,७५०, गोविंद सुखदेव गायकवाड - ४,०००, जनाबाई गायकवाड - ४,०००, निर्मला गायकवाड - ४,२००, परमेश्वर गायकवाड - ३,९००, पांडुरंग गायकवाड - ३,७५०, बबन गायकवाड - ३,८५०, बाळासाहेब गायकवाड - ४,१००, भैरवनाथ शेळके - ३,९५०, रणजित गायकवाड - ३,७५०, रत्नमाला गायकवाड - ४,०००, राणी सूर्यवंशी ३,७५०, वसंत गायकवाड - ४,०००, वैजनाथ गायकवाड - ४,१००, संभाजी गायकवाड - ३,८००, मकरध्वज सूर्यवंशी - ३,८०० व हरिभाऊ गायकवाड - ३,५०० रुपये असे एकूण ८५ हजार रुपयांचे अनुदान या शेतकऱ्यांच्या नावे काढून या रकमेचा धनादेश केज येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा केला. मात्र, याचा बोभाटा होताच हे अनुदान चुकून त्या शेतकऱ्यांच्या नावे आल्याचे पत्र तहसीलदारांनी दिल्याने बँकेने जमा केलेले अनुदान या शेतकऱ्याच्या खात्यातून कमी करत अनुदानाच्या रकमेचा धनादेश तहसील कार्यालयाला परत केला. विशेष म्हणजे हा धनादेश घेण्यासाठी तलाठी देशमुख या बँकेत थांबून होत्या.
१) शासनाने १,७०० रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केलेले असतानाही माळेगाव सजाच्या तलाठी वर्षा देशमुख यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवत सोनीजवळा येथील २२ शेतकऱ्यांची नावे पुरवणी यादीत घालत ३,५०० ते ४,२५० रुपयांप्रमाणे अनुदान काढले. याप्रकरणी तहसीलदारांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.
२) तलाठी देशमुख यांनी सोनीजवळा येथील अनुदानप्राप्त शेतकऱ्यांची एक्सल फाईलमधील नावे चुकून गेल्याचे म्हटले आहे. मात्र, सोनीजवळा येथील शेतकऱ्यांच्या यादीत या शेतकऱ्यांच्या नावाचा क्रम हा वेगळा असतानाही नावे एकाखाली एक कशी आली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
३) तलाठी देशमुख यांनी या २२ शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे सादर केली नव्हती तसेच या यादीवर आपली स्वाक्षरी नसल्याचा खुलासा वरिष्ठांकडे केल्याची माहिती मंडल अधिकारी फरके यांनी ‘लोकमत’ला दिली.