वाहनधारक त्रस्त
गेवराई : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक तसेच नागरिकांतून होत आहे. परंतु अद्यापही याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत.
नदी रुंदीकरण करा
बीड : जिल्ह्यातील महत्त्वाचे नदीपात्र सोडल्यास इतर उपनद्यांचे पात्र हे ओढ्यासारखे झाले आहे. बेसुमार होत असलेला वाळू उपसा व बाजूच्या शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण यामुळे नदीपात्र वरचेवर लहान होत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष घालून नदी रुंदीकरण करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांमधून अनेक दिवसांपासून होत आहे.
नाल्या तुंबल्याने त्रास
चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा येथे नाल्या तुंबलेल्या आहेत. परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन चिखल तयार होत आहे. तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी मागणी करूनही तुंबलेल्या नाल्या स्वच्छ केल्या जात नाहीत. त्यामुळे समस्या ‘जैसे थे’च आहे.