बीड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. तसेच याप्रकरणी भाजप नेत्यांनी आरोप केल्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, पूजाचा लॅपटॉप व मोबाईल चोरल्याप्रकरणी पुणे येथील नगरसेवक व बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिवसेना महिला जिल्हा प्रमुखाने ३ मार्च रोजी उशिरा तक्रार दाखल केली आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲड. संगीता चव्हाण यांनी पुणे येथील नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्ष पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून राजकारण करत आहे. यासाठी आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. यातून पीडित युवतीच्या कुटुंबाची व समाजाची बदनामी होत आहे. चित्रा वाघ ह्या पत्रकार परिषद घेऊन पीडित युवती गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यात आला अशा प्रकारे चारित्र्यहनन करणारी माहिती प्रसारित करत आहेत. त्यामुळे पूजाच्या आई,वडिलांची नाहक बदनामी झाली असून त्यांना तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नाही. पीडितेच्या नावाची बदनामी करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही कायद्याची पायमल्ली भाजप नेत्यांकडून करण्यात आली. तसेच पूजाच्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून काही मौल्यवान वस्तू, लॅपटॉप आणि मोबाईल चोरून मनाला वाटेल तसे काही फोटो, ऑडिओ क्लिप, व्हिडिओ छेडछाड करून सोशल मीडियात जाणूनबुजून पसरवले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ॲड.संगीता चव्हाण यांनी तक्रारीद्वारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक ठोंबरे यांनी दिली.
===Photopath===
040321\042_bed_11_04032021_14.jpg
===Caption===
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना ॲ.संगिता चव्हाण व इतर पदाधिकारी