दीपक नाईकवाडे
केज : तालुक्यातील लाडेगाव येथील अतिक्रमित गायरान जमिनीवरील हरभरा, ज्वारी व इतर रब्बीच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवून उभी पिके नष्ट करत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही मंगळवारी महसूल प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात केली.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील सर्व्हे नंबर १४३ या सरकारी गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून मागासवर्गीय समाजातील २२ भूमिहीन अतिक्रमण करून जमीन कसत होते. त्यांनी या सरकारी गायरान जमिनीवर खरिपाची पिके निघताच रब्बीची पिके पेरली होती.
दरम्यान या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणारी याचिका बालासाहेब अंबाड यांनी महाराष्ट्र शासन यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्या संदर्भात न्यायालयाने मार्च २०१९ रोजी अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला होता. तसेच प्रशासनाने अतिक्रमण हटविले नाही म्हणून अवमान याचिकाही दाखल होती. अतिक्रमणधारक भूमिहीन मोहन धीरे यांनीही अतिक्रमण हटविण्याच्या याचिकेविरुद्ध न्याय मागणारी याचिका दाखल केली होती. परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.
या सर्व बाबींची प्रशासनाने दखल घेत २८ डिसेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची तयारी केली. पोलीस, महसूल व पंचायत समिती यांनी संयुक्त कार्यवाहीची सर्व तयारी केली.
गावाला छावणीचे स्वरूप
अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करीत असताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून स्वतः तहसीलदार, डीवायएसपी, गटविकास अधिकारी, युसुफवडगाव, केज, धारूर, नेकनूर व अंबाजोगाईचे येथील फौजफाटा तैनात होता.
बॅरिकेडसह अडथळे केले
अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होताना अतिक्रमणधारकांनी घराबाहेर पडून विरोध करू नये म्हणून त्यांच्या वस्तीला बॅरिकेटिंग आणि लाकडी अडथळे तयार करून मज्जाव केला होता. २९ डिसेंबर रोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले.
अतिक्रमणधारकांची घोषणाबाजी
पिकांवर नांगर फिरवून पिके उदध्वस्त केली जात असल्याची माहिती मिळताच अतिक्रमणधारक संतप्त झाले. त्यांनी गावातील हनुमान मंदिरासमोरील चौकात येऊन महिला, पुरुष यांनी घोषणाबाजी करून कार्यवाही थांबविण्याची मागणी केली.
गावात भीतीचे वातावरण
तहसीलदार मेंढके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू करीत असताना तहसीलचे कर्मचारी, गटविकास अधिकारी दराडे, पंचायत समितीचे कर्मचारी, डीवायएसपी भास्कर सावंत, १९ पोलीस अधिकारी, ११० पोलीस, दोन शीघ्र कृती दलाच्या तुकड्या असा बंदोबस्त होता. गावात कुणाही बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नव्हता.
महिलांच्या डोळ्यांत अश्रू आणि उद्रेक
कर्ज काढून अतिक्रमित गायरान जमिनीवर पेरलेली उभी पिके नष्ट केली जात असल्याची माहिती मिळताच महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांच्या संतापाचा उद्रेकही पाहायला मिळाला. आमचेच अतिक्रमण का काढता? म्हणत शेजारील शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी या वेळी तहसीलदार व डीवायएसपींकडे करण्यात आली.