बीड : विषारी द्रव्य प्राशन करण्याच्या प्रयत्नातील एका रुग्णाने अपघात विभागातून पळ काढला. त्याला शोधण्यासाठी रात्रभर अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. या रुग्णाने संचालिका आदिती सारडा यांच्या घराचा आसरा घेतल्याचे समजत आहे. हा प्रकार स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री घडला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर करून आदित्य महाविद्यालयात नेले आहे. याच रुग्णालयात २२ वर्षीय रुग्ण बुधवारी सायंकाळच्या सुमारास आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून दाखल झाला. त्याच्यासोबत असलेले पोलीसही निघून गेले. त्यानंतर त्याने संधी साधून तेथून पळ काढला. बाजूलाच संचालिका आदिती सारडा यांचे निवासस्थान आहे. येथे त्याने आसरा घेतला. हा प्रकार समजताच सारडा यांनी शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना कल्पना दिली. त्यानंतर पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला पुन्हा ताब्यात घेऊन दाखल करण्यात आले. प्राथमोपचारानुसार तो मनोरुग्ण असल्याचे समजते. त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही करण्यात आले. तो सध्याही जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी रक्षक ठेवल्याचेही समजते.
दरम्यान, या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. अधिकारी, पोलीस, महाविद्यालय प्रशासन रात्रीच्यावेळी एकत्र आल्याने काही काळ चर्चा झाली. रुग्ण शोधून उपचार करताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकारामुळे मात्र सर्वांचीच रात्रभर पळापळ झाल्याचे सांगण्यात आले. संचालिका आदिती सारडा यांच्याशी संपर्क केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही.
कोट
एक रुग्ण निघून गेल्याचे समजले होते. तत्काळ धाव घेत त्याला शोधले. तो मनोरुग्ण असल्याचे समजते. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.