परळी : महाराष्ट्र अनलॉक झाला. परंतु, मंदिर मात्र बंदच आहे. उघड दार देवा आता...उघड दार देवा, असे भाविक म्हणू लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली. शहरातील सर्व व्यवहार चालू आहेत. परंतु, प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर अद्याप उघडलेले नाही. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक येथील प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर गेल्या एक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे भाविक, पर्यटकांवर अवलंबून असलेल्या शहरातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून मंदिर बंद आहे. दिवाळीत केवळ तीन महिने चालू होते. पुन्हा मंदिर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बंद ठेवले आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील ३५ दुकाने, १५ ऑटोरिक्षा चालक, १० चहा, हॉटेल चालकांशिवाय शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरातील ऑटोरिक्षा चालक व हॉटेल लॉजिंग आदी व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मंदिरात पौरोहित्य करणारे ५० जणही आर्थिक कचाट्यात सापडले आहेत. मंदिर परिसरातील सर्व दुकाने सुरू झाली असलीतरी प्रतिसाद नसल्याने दुकानदार संकटात आहेत.
परळीच्या वैद्यनाथ मंदिरात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेण्यात येते. मंदिर परिसरातील प्रसाद साहित्य, फुले, हार, नारळ, हॉटेलचालक, भक्तनिवास चालक, ऑटोरिक्षा चालकांसह अनेकांच्या उपजीविका अवलंबून आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी मंदिर चालू करणे आवश्यक आहे. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्याने भक्तांना समाधान लाभते व इम्युनिटी पॉवर वाढते.
- राजेश देशमुख, सेक्रेटरी, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी.
गेल्या वर्षापासून वैद्यनाथाचे मंदिर बंद असल्याने परिसरातील हॉटेलचालक व अन्य दुकानदारांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात ८ महिन्यांचे दुकानांचे भाडे वैद्यनाथ मंदिर ट्रस्टने माफ करून या परिसरातील व्यावसायिकांना आधार दिला आहे.
-श्याम बुद्रे, हॉटेलचालक वैद्यनाथ मंदिर, परळी.
कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून वैद्यनाथ मंदिर बंद आहे. सध्या लाट ओसरत आहे. कोरोनाचा धोका असलेले इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वैद्यनाथ मंदिर अद्यापही बंद आहे. नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती झालेली असून, भाविक नियम पाळून दर्शन घेतील. प्रशासनाने वैद्यनाथ मंदिर सुरू करून परळीकरांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ थांबवावा.
-अश्विन शंकरअप्पा मोगरकर, सामाजिक कार्यकर्ते.
परळीचा वैद्यनाथ हा वैद्यांचा नाथ आहे. अनेकांच्या व्याधी त्यांच्याच कृपेने नाहीशा होतात. या महामारीच्या काळात मन:स्वास्थ्य हरवलेल्या परिस्थितीत मानसिक समाधान वैद्यनाथाच्या दर्शनामुळे होते, अशी आमची श्रद्धा आहे. त्यामुळे वैद्यनाथ मंदिर सुरू करावे.
- गोपाळ आंधळे, भाविक परळी.