भारतभूषण क्षीरसागर यांची माहिती : वाढती लोकसंख्या लक्षात घेत केली मागणी
बीड : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बीड शहरातील नवीन १०० अंगणवाड्यांचे प्रस्ताव मंजूर करावेत, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी २१ जून रोजी मुंबईत राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.
शहरातील लोकसंख्येनुसार विविध भागामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमार्फत सहा व तीन महिन्यांची बालके, गरोदर माता व किशोरवयीन मुलींना कच्चे धान्य पुरवठा करण्यात येऊन वैद्यकीय सेवेचा लाभ देण्यात येतो; परंतु बीड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरातील विविध भागांत बालकांना, गरोदर मातांना व किशोरवयीन मुलींना या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने नवीन अंगणवाड्या मंजूर करण्याबाबतचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. यावर सभागृहात चर्चादेखील करण्यात आली आहे. त्यानुसार गरीब महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना कच्चे धान्य पुरवठा, वैद्यकीय सेवा व लहान मुले साक्षर होण्याच्या दृष्टीने नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना धानोरा रोड, बीड यांच्यामार्फत आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र शासन, नवीन मुंबई यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्यात आला आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.