वृद्धेला घर परत मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ सरसावला
अंबाजोगाई : सेवानिवृत्त वृद्धेचा सुनेने बहिणीच्या मदतीने अनन्वित मानसिक आणि शारीरिक छळ केला. पेन्शन न दिल्याने सासूला उपाशी ठेवले. अखेर अंबाजोगाई येथील ज्येष्ठ नागरिक संघाने त्या वृद्धेला मदतीचा हात देऊन पाठबळ दिले. वृद्धेच्या तक्रारीवरून सून आणि तिच्या बहिणीवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमान्वये बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भागीरथीबाई बाबुराव वाडेकर (७०, रा. चनई ता. अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीनुसार, त्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी होत्या. नोकरीवर असताना त्यांनी स्व-कमाईतून चनई येथे प्लॉट घेऊन घराचे बांधकाम केले. दरम्यानच्या काळात अविनाश याला दत्तक घेतले होते आणि त्याचा विवाह स्वाती नामक तरुणीशी लावून दिला. त्यानंतर त्यांनी स्वातीचे दहावी ते नर्सिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिले. तिचे शिक्षण सुरू असताना भागीरथीबाईनी तिन्ही नातवांना सांभाळले. काही काळानंतर अविनाशचा मृत्यू झाला. अविनाशच्या मृत्यूनंतर स्वातीच्या वर्तणुकीत बदल झाला आणि तिने बहीण ज्योती अनिल निलंगे हिच्या साह्याने भागीरथीबाईंना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. कोरोना काळात स्वातीला लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात नोकरी मिळाल्याने ती भागीरथीबाईंच्या घरी आली. त्यानंतर दोघीही बहिणी त्यांच्या पेन्शनवर अधिकार गाजवू लागल्या. पेन्शन देण्यास नकार देताच भागीरथीबाईंना मारहाण करून उपाशी ठेवण्यात आले. या फिर्यादीवरून स्वाती अविनाश वाडेकर आणि ज्योती अनिल निलंगे या दोघींवर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघाने दिला आधार
सुनेने मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार घेऊन भागीरथीबाई ज्येष्ठ नागरिक संघाकडे आल्या होत्या. संघाचे मराठवाडा (दक्षिण) उपाध्यक्ष दामोदर थोरात, अंबाजोगाई अध्यक्ष कुंडलिक पवार, सचिव मनोहर कदम, कोषाध्यक्ष धनराज मोरे आणि राजेंद्र रापतवार यांनी भागीरथीबाईंना सोबत घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शहर पोलीस ठाणे गाठून पूर्वी दाखल झालेला अदखलपात्र गुन्हा बदलून ज्येष्ठ नागरिक आणि पालकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून घेण्यास भाग पाडले. ॲड. सुभाष शिंदे यांनी याप्रकरणी कायदेशीर मदत केली. भागीरथीबाईंना त्यांच्या नावे असलेल्या घराचा ताबा देण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह पुष्पा बगाडे, कमल बरुरे, मंगला भुसा, सरस्वती फड, अयोध्या गाठाळ आदी सदस्यांनी केली आहे.