परळी : येथील पंचायत समितीच्या सभापती ऊर्मिला गीत्ते यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठराव गुरुवारी पंचायत समिती सदस्यांच्या विशेष सभेत संमत झाला. ठरावाच्या बाजूने ११ पैकी १० सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. तर सभापती स्वतः गैरहजर राहिल्या. यावेळी तहसील परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त होता.
परळी पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी सभापती ऊर्मिला बबन गीत्ते यांच्या विरोधात २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या ठरावावर विचार विनिमय करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता परळी पंचायत समिती सदस्यांची एक विशेष सभा बोलवण्यात आली होती. पावणेअकराच्या सुमारास तहसीलच्या सभागृहात १० सदस्य आले. ११ वाजता उपजिल्हाधिकारी तथा पीठासन आधिकारी नम्रता चाटे यांच्या उपस्थितीत विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी एकूण ११ पैकी १० सदस्य उपस्थित होते. तर सभापती ऊर्मिला गीत्ते ह्या गैरहजर होत्या. उपस्थित सर्व १० सदस्यांनी सभापतीविरोधात अविश्वास ठराव हात उंच करून पारित केला. अविश्वास ठरावाची प्रक्रिया शांततेत पार पडली. या विशेष सभेकरिता अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.जी. घोनसीकर, परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर उपस्थित होते.
राष्ट्रवादी, भाजपचे सदस्य एकत्र आले
अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर परळी तहसील परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तसेच शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. राष्ट्रवादी व भाजपाच्या सदस्यांनी एकत्रित येऊन सभापती ऊर्मिला गीत्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित केला.