थंडी-तापाचे रुग्ण वाढले
अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन वेळा पाऊस पडला, तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी ऊन, तर कधी पाऊस, अशा वातावरणातील बदलामुळे थंडी- तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खाजगी रुग्णालय हाउसफुल होत असून, उपचार करून घेण्यासाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.
कालबाह्य पुलाच्या दुरुस्तीची गरज
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर- बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. दुरुस्ती न केल्यास अपघाताचा धोका संभवतो त्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
कृषी साहित्याच्या चोऱ्या वाढल्या
बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला, तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
वाळलेल्या वृक्षांचा धोका वाढला
धारूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जुने वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. हे वृक्ष वाळलेले असून, जोरदार वारा सुटला की, धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे मामला तलावाच्या काठावरील वाळलेले जुने वृक्ष काढण्याची गरज आहे.
जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन
माजलगाव : पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन जनावरांचे आरोग्य सांभाळावे. पावसाळ्यात जनावरांच्या खाण्यात बदल झाल्यामुळे पोटाचे विकार, आजार निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व इतर नुकतेच गवत उगवलेले असते. गवताची उंची जास्त नसल्याने जनावरांचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात. असे झाल्यास पशुपालकांनी त्वरित पशुवैद्यकीय डाॅक्टरकडून उपचार करून घ्यावेत व नुकसान टाळावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभाग गावोगावी करीत आहे.
चालकांची कसरत, खड्ड्यातून मार्ग
वडवणी : हरिश्चंद्र देवस्थानात जाणारा मुख्य रस्ता चिंचोटी गावापर्यंत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने चालकांना कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
गाजर गवताच्या वेढ्याने अस्वच्छता
अंबाजोगाई : शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वच्छतेकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात आहे. ही स्वच्छतेची समस्या मार्गी लावली जात नाही. स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
दुभाजक सुशोभीकरण करण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर असलेल्या दुभाजकाची दुरुस्ती करून त्याला रंग देण्यात यावा, तसेच या दुभाजकांमध्ये येत्या पावसाळ्यात शोभित फुलांची झाडे लावल्यास शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. यासाठी नगरपालिकेने आतापासून नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
बीड : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे; परंतु याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसत असून, सद्य:स्थितीत शहरातील अनेक भागांतील कचराकुंडीतील कचरा नियमित उचलला जात नसल्याने पावसाने या कचऱ्याची दुर्गंधी येऊ लागली आहे.