बीडच्या जुना मोंढ्यातील बारदाना पोत्याचे व्यापारी मयूर जयनारायण काबरा यांच्या दुकानातील गल्ल्यात असलेले ३ लाख २५ हजार रुपये घेऊन दत्ता काशीद हा कामगार फरार झाला होता. व्यापाऱ्याने तपासणी केली असता, चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी दत्ता काशीद याच्यावर पेठ बीड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा छडा लावण्याचे आदेश पेठ बीड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला वरिष्ठांनी दिले होते. दरम्यान, दत्ता काशीद अहमदनगर येथे असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पेठ बीड पोलिसांचे पथक अहमदनगरला गेले. सायबर सेलची मदत घेत पोलिसांनी दत्ताचा निश्चित ठावठिकाणा शोधला आणि सापळा रचून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. पेठ बीड ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने २ लाख ७४ हजार ५०० रुपये रोख आणि चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला २० हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि भारत राऊत यांच्या मदतीने पोउपनि बनकर, पोलीस कर्मचारी राहुल गुरखुदे, गणेश जगताप, सुनील आलगट, आसेफ शेख, सचिन क्षीरसागर, महेंद्र ओव्हाळ, विकी सुरवसे यांनी पार पाडली. ४८ तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक केल्याने पेठ बीड पोलिसांचे कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.