तेलगावपासून जवळच असलेल्या कारी, ता. धारूर येथे असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर संस्थानात गेल्या कित्येक वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन कारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. सात दिवस येथे भरगच्च धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र गेल्या वर्षीपासून देशभरात कोरोना व्हायरससारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. यामुळे गर्दी होतील, असे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर व घेण्यावर शासनाने बंदी घातली आहे. गर्दी होणाऱ्या कार्यक्रमातून कोरोना फैलावण्याचा धोका असल्याने सर्वच सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत. असे शासनाने आदेश दिले असून, त्यासंदर्भात नियमही काढले आहेत. शासनाच्या या नियमांचे पालन करत कारी, ता.धारूर येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला कारी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर संस्थानात होणारा सप्ताह यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सप्ताहासाठी येणाऱ्या संत, महाराज, वारकरी, भजनी मंडळ तसेच भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन यंदा सप्ताह रद्द असल्याने येऊ नये, असे आवाहन कारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कारी येथे महाशिवरात्री सप्ताह रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST