अंबाजोगाई : तालुक्यातून बीड जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र भगवानराव लोमटे, तर काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक सुनील वाघाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार लोमटे व वाघाळकर यांची नियुक्ती अंबाजोगाई शहरातून झाली आहे. या दोघांच्या झालेल्या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या वतीने काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर ठिकठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणे अनेकांना दंड बसत असल्यामुळे महागात पडले आहे.
शेतकऱ्यांची तारांबळ
अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. अचानक पावसाच्या सरी, गारपीट, वादळी वारे होऊ लागल्याने शेतात असणारा हरभरा, गहू, ज्वारी, अंबा या पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी पीक झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षीच बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
विजेचा लपंडाव सुरू
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सातत्याने सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वीज प्रवाह सातत्याने खंडित होऊ लागला आहे. अंबाजोगाई शहरातील अर्धे अंबाजोगाईकर सोमवारी रात्री अंधारातच होते. तर ग्रामीण भागातही अशी स्थिती निर्माण झाली होती. सतत होणाऱ्या खंडित प्रवाहामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. दुरूस्तीच्या नावाखाली तासनतास विद्युत पुरवठा खंडित ठेवला जात आहे. याचा मोठा त्रास नागरिकांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र जाधव यांनी केली आहे.
वराहांचा सुळसुळाट, नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात प्रामुख्याने जुन्या गावांमध्ये रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साठले आहेत. अशा ठिकाणी वराहांचा सुळसुळाट गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे वराह मुख्य रस्त्यावर व अनेकांच्या घरांसमोर मोठी घाण करतात. याची मोठी दुर्गंधी निर्माण होते. अनेकदा या वराहांच्या रस्त्यावरील प्रादुर्भावामुळे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. नगर परिषद प्रशासनाने या वराहांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मधुकर नागरगोजे यांनी केली आहे.