सुंदर माझे कार्यालय : कर्मचारी, विभाग प्रमुखांच्या कार्यशाळेत वरिष्ठांचे मार्गदर्शन
बीड : कार्यलयीन स्वच्छता, नीटनेटकेपणात सुधारणा करण्यासह कार्यालयीन कामकाजाबाबत बुधवारी विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात ही कार्यशाळा पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी कार्यालयीन कामकाजाच्या पध्दतीबाबत तसेच कार्यालयीन टिप्पणी, नस्ती सादर करताना घ्याव्या लागणाऱ्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक संचिका सादर करावी, संचिका सादर करताना संगणकीकृत टिप्पणी तयार करावी. टिप्पणीमध्ये शासन निर्णयाचा स्पष्ट उल्लेख आदी बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. संबंधित कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायकांनी विभाग प्रमुखाकडे टिप्पणी सादर करण्याबाबत सूचना केल्या. आपले अभिलेखे ग्रामविकास विभागाच्या ३ ऑक्टोबर २०१७ शासन निर्णयनुसार वर्गीकरण करणे, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, अभिलेखे सहागठे पध्दतीनेच ठेवण्याबाबत सविस्तर सूचना केल्या.
या कार्यशाळेत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभाग स्तरावरील सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.