कडा : आज जो तो नोकरीसाठी कठीण प्रसंगाचा सामना करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी तयार होतो. वेळप्रसंगी जमिनीचादेखील काटा करून नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न करत असतो. आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील बाळासाहेब वायभासे या तरुणाने खासगी संस्थेत शिक्षकाची नोकरी सोडून शेतीकडे जाण्याचा मार्ग शोधला आणि खडकाळ माळरानावर मेहनतीच्या जोरावर डाळिंब लागवडीत सहा वर्षांत साठ गुंठे शेतात वीस लाख रुपयांचे उत्पन्न घेत प्रगतीचे पाऊल ठेवले.
बाळासाहेब वायभासे हा उच्चशिक्षित तरुण अहमदनगर येथील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीला होता; पण अनेक वर्ष नोकरी करून अल्प मानधन मिळत असल्याने नोकरी सोडून शेती केलेली बरी, हा विचार मनात कायम घर करून होता. अखेर नोकरीकडे पाठ करून आपल्या खडकाळ माळरानावर जेथे फक्त पावसाच्या पाण्यावरच पीक यायचे तेथे नवीन तंत्रज्ञान अवगत करून व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने डाळिंबाची बाग लावली. २०१३ मध्ये दीड एकर शेतात गावातच तयार केलेले भगव्या डाळिंबाची ६५० रोपे १८ हजार रुपयांत खरेदी करून लागवड केली. एक वर्षानंतर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून बाग बहारात आणली आणि नोकरीपेक्षा आपलीच शेती भारी, हे सिद्ध करून दाखवले. पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेती केली तर नोकरीपेक्षा सरस ठरते. शेतीत जरी सुरुवातीला फळबागांना रोगाने गाठले तरी खचून न जाता त्यावर मात करून नवनवीन प्रयोग करून शेती केली तर भविष्यात आपल्याला कोणाचे गुलाम बनण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गड्यांनो आपली शेतीच बरी आणि तीच खरी, अशी प्रतिक्रिया तरुण शेतकरी बाळासाहेब वायभासे यांनी लोकमतला दिली.
कष्टाने पिकवू शकतो सोने
सहा वर्षांत रोपे, खत, फवारणी, मेहनत, असा तीन लाखांच्या घरात खर्च केला. जागेवरच व्यापाऱ्यांना विक्री करून सहा वर्षांत वीस लाखांचे उत्पन्न घेऊन बाळासाहेब वायभासे याने डाळिंब बागेतून तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला असून, आपणच आपल्या कष्टाने शेतीत सोने पिकवू शकतो, हे दाखवून दिले आहे.
280821\28bed_9_28082021_14.jpg~280821\28bed_8_28082021_14.jpg~280821\28bed_7_28082021_14.jpg