परळी : शहरात अवैधरीत्या साठवणूक केलेले राखेचे साठे जप्त करून त्यावर कडक कार्यवाही करावी, अवैध वाहनांवर जप्ती आणून त्या वाहनधारकांवर कारवाई करावी. शहरातून वाहतूक केली जाणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी तसेच नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी राख वाहतुकी संदर्भात आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करावे असे सक्तीचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख परिसरातील वीट भट्ट्यांना मोफत दिली जावी असा नियम आहे, मात्र काहीजण राखेची अवैध साठवणूक करत आहेत. वाहतूक करणारी बरीच वाहने बोगस नंबर प्लेट असलेली असून, राख वाहतुकीच्या बाबतीतील नियम पाळताना दिसून येत नाहीत. पर्यायाने नागरिकांना या वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो तसेच परिसरातील वातावरणावरही राख मिश्रित धुळीचा परिणाम जाणवू लागला आहे. या संदर्भात जनतेतून तक्रारी वाढल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी ठोस पावले उचलली.
सायंकाळी धनंजय मुंडे यांनी औष्णिक विद्युत केंद्र, पोलीस व वाहतूक शाखेतील अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक घेत याबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले. या बैठकीस मुंडे यांच्यासह जि. प. गटनेते अजय मुंडे, न. प. गटनेते वाल्मीक कराड, रा. कॉ. तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, प. स. सभापती बालाजी मुंडे, बाजार समिती संचालक सूर्यभान मुंडे, भाऊ कराड, औष्णिक विद्युत केंद्राचे सीजीएम मोहन आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, प्रांताधिकारी नम्रता चाटे, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तहसीलदार शेजुळ, गटविकास अधिकारी केंद्रे, तहसीलदार रुपनर, पोलीस निरीक्षक पुर्भे, कदम, संतोष रोडे, चंद्रकांत कराड आदी उपस्थित होते.
राख वाहतूक करताना वाहनांमधून रस्त्यावर राख बऱ्याच प्रमाणात सांडते, या राखेला सक्शन मशीनच्या साहाय्याने साफ करावे, यासाठी नगर परिषदेची मदत घ्यावी. तसेच सक्शन यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रमाणात पालकमंत्री मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच उर्वरित निधी औष्णिक विद्युत केंद्राच्या सामाजिक उत्तर दायित्व निधी (सीएसआर) मधून उपलब्ध करून द्यावा, असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
===Photopath===
200321\img-20210320-wa0467_14.jpg