अंबाजोगाई : यशस्वी व्हायचे तर मनातील जळमटे काढून टाकणे आवश्यक आहेत. त्याशिवाय मनातील स्वप्ने गाठणे शक्य होत नाही, असे प्रतिपादन औरंगाबाद उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लेखा परीक्षक शरद भिंगारे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची सुरुवात भिंगारे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वनमाला गुंडरे होत्या. विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, उपप्राचार्य पी. के. जाधव, उच्च शिक्षण कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक व्ही. एस. राऊत, आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी शरद भिंगारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी घडलो. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगणे ही सर्वांत मोठी चूक असते. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप समजावून सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. शिकवण्या न लावता यश कसे प्राप्त करता येईल हा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अंबाजोगाईचा परिसर आणि माती ही ऊर्जामय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी काळाची गरज ओळखून स्वतःला विकसित करणे हे आपल्या हाती असते. आयुष्यात ध्येय बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे, मोठे स्वप्न पाहणे व ते अंमलात आणणे हा ध्यास विद्यार्थ्यांनी कायम घेतला पाहिजे. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. इंद्रजित भगत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अनंत मरकाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. दिनकर तांदळे, डॉ. मुकुंद राजपंखे, डॉ. संजय सुरेवाड, डॉ. अरविंद घोडके, डॉ. विठ्ठल केदारी, प्रा. प्रशांत जगताप, प्रा. धनाजी खेबडे, कार्यालयीन अधीक्षक सतीश एरंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.