बीड : जिल्ह्यातील कोविड संक्रमित संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी हे कोविड संक्रमित येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा कोविड संक्रमित अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून इतरांना संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी २३ मार्च रोजी, पोलीस विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी २४ मार्च रोजी, जिल्हा परिषद विभागाच्या अधिनस्त सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी २५ व २६ मार्च रोजी, न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, कर्मचारी यांनी २७ मार्च रोजी आणि जिल्ह्यातील सर्व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी २८ व २९ मार्च, अँटिजन, आरटीपीसीआर टेस्ट तपासणी करून घ्यावी. तपासणीसाठी दर्शविण्यात आलेल्या दिनांकानंतर कार्यालयात येणारे कोणतेही अधिकारी, कर्मचारी हे अँटिजन, आरटीपीसीआर तपासणी न करता कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत, याची कार्यालय प्रमुख यांनी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी जगताप यांनी दिले आहेत.