लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात जलशुद्धीकरण अथवा पाणी टाकीतून पाणी पुरवठा करण्यापूर्वी त्याची चाचणी केली जाते. यात ती योग्य असेल तरच ते पाणी पुढे सोडले जाते. यासाठी बीडमध्ये जिल्हा आरोग्य प्रयोगशाळाही कार्यान्वित आहे. आतापर्यंत तरी एकही अहवाल पाणी पुरवठ्यास अयोग्य असल्याचा आलेला नाही. परंतु तुटलेले नळ, नाल्यांतील कुजलेली पाईपलाईन आदी कारणांमुळे काहींच्या नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते. परंतु या चुका सुधारण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज असून, पालिकेने त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.
बीड शहराला माजलगाव आणि बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. दररोज ३४ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. परंतु २८ एमएलडी पाणी शहरात दररोज येते. त्यातच शहराची हद्दवाढ झाल्याने पाणी जास्त प्रमाणात लागते. शहरात प्रति दिवस प्रति माणूस १०० लीटर, तर हद्दवाढ भागात ९० लीटर पाणी दिले जाते. सध्या आठवड्याला पाणी येत आहे. असे असले तरी जेवढे पाणी लागते, तेवढे माणसांना दिले जात असल्याचा दावा पालिका करीत आहे. हे पाणी पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक चार तासाला जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी नमुन्यांची चाचणी केली जाते. तसेच पाणी टाक्या आणि नळांमधूनही जवळपास १०० मिलिलीटर पाणी घेऊन प्रयोगशाळेत पाठिवले जात असल्याचे सांगण्यात आले.
नाली, गटारीतील नळांना अशुद्ध पाणी
जलशुद्धीकरण केंद्र अथवा पाण्याच्या टाकीतून होणारा पाणी पुरवठा शुद्ध असतो. परंतु ज्यांचे नळ नाली अथवा गटारातून गेलेले आहेत, ते अनेक ठिकाणी लिकेज असतात. त्यामुळे पाणी आत जाते आणि नळाला अशुद्ध पाणी येते. या नळांना कव्हरींग असणे खूप महत्वाचे आहे. परंतु नागरिक ते बसवत नाहीत. सध्या रस्त्याची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळेही कचरा, माती आत गेल्याने नळाला अशुद्ध पाणी येत असल्याचे दिसते.
अशी हाेते तपासणी
n बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, नळ या ठिकाणचे दरराेज जवळपास १० नमुने तपासणीसाठी घेतले जातात. हे सर्व नमुने ठराविक अंतराने संकलित केले जातात.
n संकलित केलेले पाणी नमुने चाचणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. आतापर्यंत टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राचे अहवाल अशुद्ध पाणी आले नसल्याचे सांगण्यात आले.
दररोज ठराविक अंतराने पाण्याचे १० नमुने चाचणीसाठी घेतले जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासले जातात. अद्याप तरी पाणी अयोग्य असा अहवाल आलेला नाही. शहरात दररोज प्रति माणसी, प्रति दिवस १०० लीटर पाणी दिले जाते. आऊटकटला ९० लीटर पाणी दिले जाते.
- राहुल टाळके, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, नगर परिषद, बीड