घाटनांदूर : येथील स्वर्णमहोत्सवी श्री सोमेश्वर शिक्षण परिवारातील श्री सोमेश्वर कन्या प्रशालेत स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रर्वतक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सावित्रीच्या लेकींचा सन्मान करत स्वयंशासन दिन सोमवार व मंगळवार असा सलग दोन दिवस घेण्यात आला.
विद्यार्थिनींना शाळेतील प्रशासन, कामकाज समजावे, या उद्देशाने सलग दोन दिवस मुख्याध्यापक, शिक्षिका, सेवक, लिपिक, क्रीडाशिक्षक या सर्वच भूमिका विद्यार्थिनींना देत कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी रांगोळी, क्रीडा, वकृत्व, निबंध अशा स्पर्धा, अध्यापन, व्यवस्थापन आदी कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थिनींचे स्टेज डेअरिंग वाढून आत्मविश्वास वाढावा, यासाठी विशेष कार्यक्रम व मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंशासन दिन मुख्याध्यापिका म्हणून साधना ठोंबरे हिने कार्यभार सांभाळला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका खंडाळे, पर्यवेक्षिका जाधव, नखाते, के. आर. रेड्डी, शिवराज निळे , योगीराज शिवगण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.