अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस नाईक तानाजी तागड, हवालदार नारायण गायकवाड व होमगार्ड आर.एस. चामनर हे मंगळवारी रात्री हद्दीत गस्त घालता? होते. लोखंडी सावरगाव, वरपगाव, माकेगाव, नांदडी फाटा मार्गे ते कुंभेफळ येथे आले. यावेळी त्यांना एक ढाबा मध्यरात्री १२.३० वाजता सुरू असल्याचे आढळले. तसेच ढाब्यासमोर उभ्या कारमध्ये (क्र.एमएच ४४ जी-३२५३) बसलेले काही लोक आरडाओरड करीत होते तसेच हॉर्न वाजवीत होते. पो.ना. तानाजी तागड व सहकाऱ्यांनी ढाबामालक पंकज अविनाश मोरे यास इतक्या उशिरापर्यंत ढाबा कसा काय सुरू ठेवला, अशी विचारणा केली. तसेच कारमधील चौघांना गोंधळ का घालता, असा प्रश्न केला. त्यावर चौघेही कारमधून सुसाट निघून गेले व पुन्हा परत आले. तुम्ही आम्हाला विचारणारे कोण, आमचे वरपर्यंत हात आहेत, तुमच्याकडे पाहतो, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यावर पोलिसांनी शिवीगाळ करू नका, असे बजावले असता ढाबामालकासह कारमधील चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तागड यांच्या डोळ्याला, पोटाला व उजव्या हाताच्या मनगटाला जखम झाली. त्यानंतर पाचही जणांनी पोबारा केला. मात्र, बालाजी लोखंडे हा पळून जाताना खड्ड्यात पडल्याने पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी बालाजी लोखंडे, श्याम भोसले, महेश देशमुख, आण्णा थोरात (सर्व रा. अंजनपूर) व ढाबा मालक पंकज मोरे (रा. कुंभेफळ) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन पोलिसांसह होमगार्डला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST