बीड : जिल्ह्यात कोरोनाने शनिवारी विक्रम नोंदविला. एकाच दिवसात पहिल्यांदाच ४३४ कोरोनाबाधित रुग्ण, तर १२ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. अंबाजोगाई व बीड तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाबत जिल्ह्याची चिंता वाढत चालली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात ३२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत ३०० रुग्ण दररोज आढळत होते. शनिवारी तर आतपर्यंतचा उच्चांक गाठला. जिल्ह्यात दिवसभरात दोन हजार ९५९ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी दोन हजार ५२५ अहवाल निगेटिव्ह आले, तर ४३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक ११२, बीड ९५, आष्टी ६३, धारुर ४, गेवराई १३, केज २२, माजलगाव ३०, परळी ५४, पाटोदा २३, शिरूर १२ आणि वडवणी तालुक्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात बाराजणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात जुन्या पाच रुग्णांसह पात्रुड (ता. माजलगाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, ममदापूर (ता. परळी) येथील ७५ वर्षीय पुरुष, बीड शहरातील नगर रोड येथील ६५ वर्षीय पुरुष व बालेपीर येथील ७५ वर्षीय पुरुष, बोधीघाट अंबाजोगाई येथील ६३ वर्षीय पुरुष, हनुमान चौक माजलगाव येथील ७० वर्षीय पुरुष व साळेगाव (ता. केज) येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच ३२७ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता एकूण बाधितांची संख्या २६ हजार ७१४ एवढी झाली आहे. पैकी २४ हजार १६१ कोरोनामुक्त झाले असून, ६५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी ४०४ ची होती नोंद
जिल्ह्यात यापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत व्यापारी, दुकानदारांसह मोठ्या गावांतील लोकांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. यात रोज २०० ते ३०० रुग्ण आढळत होते. २२ सप्टेंबर २०२० राेजी ४०४ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली होती. हा कोरोना सुरू झाल्यापासूनचा बीड जिल्ह्यात उच्चांक होता. आता ४३४ नवा उच्चांक झाला आहे. तसेच मृत्यूनेही विक्रम मोडला आहे.
कोट
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शनिवारी आढळलेली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वांत जास्त होती. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
कोट
प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. जास्तीत जास्त संशयित शोधून त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. बाधितांवर तत्काळ उपचार केले जात आहेत. यासाठी दररोज नियोजन आणि आढावा घेतला जात आहे.
डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड