माजलगाव : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला असून यात येथील राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांंच्या गटाला हाबाडा बसला. माजलगाव तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर चोपनवाडी बिनविरोध झाली. त्यानंतर तालुक्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या नित्रुड , दिंद्रुड , मोगरा व गंगामसला या ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. यापूर्वी या सर्व ग्रामपंचायत येथील आ. प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात होत्या. मात्र यंदा यासर्व ग्रामपंचायतीत आ.सोळंके गटाच्या पदरी निराशा आली. विशेषतः गंगामसला ग्रामपंचायतही आ.सोळंके यांच्या पत्नी जि.प.सदस्य असलेल्या गटातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ती प्रथमच आ. सोळंकेच्या विरोधात गेली आहे. या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नित्रुड ग्रामपंचायतमध्ये कम्युनिस्टांनी राष्ट्रवादीचा सफाया केला. मोगरा व दिंद्रुड ग्रामपंचायतीत भाजप मित्र पक्षाला बहुमत मिळाल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. तर मोगरा ग्रामपंचायतीत आमचेच बहुमत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. आ.प्रकाश सोळंके गटाला भाजपचे रमेश आडसकर गटाने या निवडणुकीत चांगलाच हाबाडा दिला.सोमवारी सकाळीच सुरू झालेल्या मतमोजणी नंतर दोन तासात सर्व चित्र स्पष्ट झाले होते. मतमोजणीस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चार ग्रामपंचायतीत सोळंके गटाला हाबाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:35 IST