माजलगाव : माजलगाव तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयांतर्गत असलेल्या एकूण ९१ ग्रामपंचायतींनी (दिव्यांग) दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता एकूण निधीपैकी (स्वउत्पन्नाच्या, अर्थसंकल्पाच्या) पाच टक्के निधी राखून ठेवावा व तो अपंग व्यक्तींच्या बॅंक खात्यामध्ये थेट जमा करावा, अशी मागणी उपेक्षित समाज संघटना (दिव्यांग)चे अध्यक्ष ॲड. गौतम मिसाळ, ॲड. बी. एस. नाडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनानुसार, केंद्र शासनाने पारित केलेल्या अपंग व्यक्ती समानसंधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग - अधिनियम १९९५ व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये दिव्यांगांचे जीवन सक्षम करण्यासाठी महाराष्ट् शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करून दिव्यांग व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून द्यावी. २०१४ ते २०२०पर्यंतचा दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला पाच टक्के निधी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांनी दिनांक २६ जानेवारी २०२१ पर्यंत वाटप करण्याचे लेखी हमीपत्र पुरावा म्हणून देण्यात यावे तसेच यासाठी दिरंगाई केल्यास दफ्तर दिरंगाई अधिनियमांतर्गत ग्रामसेवकांविरूध्द कारवाई करावी. अपंगांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिनांक ३ डिसेंबर रोजी अपंग दिनानिमित्त देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत दिव्यांगांच्या बॅंक खात्यात पाच टक्के निधी तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींनी जमा करावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा उपेक्षित समाज संघटना (दिव्यांग)चे अध्यक्ष ॲड. गौतम मिसाळ, ॲड. बी. एस. नाडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ८ जानेवारीला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.