पुलांना कठडे बसविण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत. यापूर्वीही कठडे नसलेल्या पुलावर अनेक वाहनचालक पडलेले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुलांना कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा
अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक, प्रशांतनगर, शिवाजी चौक या भागात असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांसमोर चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक आपल्या दुचाकी गाड्या बिनधास्त रस्त्यावर लावून टपऱ्यावर चहा पीत बसतात. गाड्या रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. बेशिस्त पार्किंग, समोर असणारे हातगाडे यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
चोरीच्या घटना वाढीने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून गेल्याने चोरट्यांना आयतेच रान मिळाले. परिणामी, घरफोड्या वाढल्या. तसेच मोटारसायकलची शहरात मोठ्या प्रमाणात चोरी वाढली आहे. या वाढत्या चोऱ्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.