लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. नाल्या तुंबलेल्या आहेत, कचऱ्याचेही ठिकठिकाणी ढीग साचले आहेत; परंतु कोणीही हा कचरा उचलत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने कचरा उचलण्याचे कंत्राटही दिले आहे; परंतु तरीही घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, स्वच्छताही होत नाही, अशा तक्रारी पुढे येत आहेत. यावरून पालिकेच्या नियोजनाचाच कचरा झाल्याचे दिसत आहे. यामुळे बीडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पालिकेचे जवळपास १८० कर्मचारी काम करतात, तसेच कंत्राटदारालाही प्रति घर, प्रति किलो कचरा उचलण्यास सांगितलेले आहे. पालिका आणि कंत्राटदाराच्या जवळपास ५० घंटागाड्या आहेत. असे असले तरी शहरातील कचरा पूर्णपणे उचलला जात नसल्याचे दिसते. सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.
जमा केलेल्या ओला व सुका कचऱ्याचे केले जाते नियोजन
बीड शहरातून दररोज निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जातो. ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती केली जाते, तसेच सुका कचऱ्याचेही वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी बीड पालिका नियोजन करीत आहे.
बीडपासून जवळच असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात कचरा विलगीकरणासाठी प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. मागील दाेन वर्षांपासून येथे विविध प्रयोग केले जात आहेत.
जीपीएसद्वारे घंटागाड्यांवर वॉच
शहरात कचरा उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घंटागाडीवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, तसेच स्वच्छता निरीक्षकही लक्ष ठेवतात. सर्व नजर ठेवून असतानाही गल्लीत, दारात घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पालिकेने याची उलटतपासणी करून खात्री करण्याची गरज आहे.
कोट
शहरातून निघणारा सर्व कचरा दररोज घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे उचलला जात आहे. यासाठी कंत्राटही दिलेले आहे. प्रत्येक घंटागाडीवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे, तसेच सर्व स्वच्छता निरीक्षकांनाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितलेले आहे. शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केले जात आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे.
-डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद, बीड