परळी (जि. बीड) : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामात झालेल्या ३७ लाख ९४ हजार रुपयांच्या साहित्य चोरी प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात परळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या चौघांपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा आहे. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशाॅप गोदामातून नुकतेच संगणक संच, माॅनिटर, काॅपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये लंपास केले होते. ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ९४ हजार ९१४ इतकी होती. कारखान्याचे लिपिक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी २२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी २३ रोजी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख रा. परळी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे हे करीत असून तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरी प्रकरणात एका नगरसेविकेच्या पतीचाही समावेश असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे
वैद्यनाथ कारखाना चोरी प्रकरणात चौघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST