केज : कळंब येथील प्रियदर्शनी अर्बन को-बँकेकडून ऊस वाहतूक ठेकेदारीकरिता बंँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता उलट बँकेकडे गहाण ठेवलेल्या जमिनीवरील कर्जबोजा परस्पर कमी करून बनावट ७/१२ तयार करून बँकेकडे गहाण असलेली जमीन विक्री केली. त्यामुळे बँकेची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी युसूफवडगाव येथील एका जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांसह पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महारुद्र सखाहारी लामतुरे यांनी कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील प्रियदर्शनी बँकेकडून १८ नोव्हेंबर २०१५ ते २ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये सदर बँकेकडून १० लाखांचे मुदत कर्ज घेतले होते. सदर कर्जाचे वेळी बँकेला युसूफवडगाव शिवारातील स्वतः व पत्नीच्या नावे असलेली जमीन शेत सर्व्हे नंबर १३१ व सर्व्हे नंबर १६० मधील ३ हेक्टर ५५आर एवढी जमीन बँकेकडे गहाणखत ठेवली होती. त्यामुळे सदर जमिनीवर ७/१२ उताऱ्यावर बँकेने बोजा टाकला होता. परंतु सदरच्या कर्जाची परतफेड न करता लामतुरे यांनी बेकायदा व स्वतः च्या फायद्यासाठी बनावट ७/१२ बोजाविरहित सातबारा तयार करून यातील ३ हेक्टर ५५ आर इतकी जमीन शांतीलिंग विश्वनाथ लामतुरे यांना विक्री केली. त्यामुळे सुशीला महारुद्र लामतुरे व महारुद्र सखाहारी लामतुरे व शांतीलिंग विश्वनाथ लामतुरे यांचेविरुद्ध प्रियदर्शनी बँकेचे शाखा वसुली अधिकारी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.