धारुर : येथील सामाजीक वनीकरण कार्यालय सुरू होऊनही या कार्यालयात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजारोहण झाले नाही. यासंदर्भात न आलेल्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याने व शेजारील शाळेत झालेल्या ध्वजारोहणास उपस्थित रहिल्याचे कर्मचाऱ्यांनी संगितल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. धारुर येथे आॕॅगस्ट २०२० मध्ये सामाजिक वनीकरण कार्यालय सुरू झाले. या कार्यालयात वनक्षेत्र अधिकारी व वनरक्षक ही दोन पदे आहेत. प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण न झाल्याने हे कार्यालय चांगलेच चर्चेत आले. याची तक्रार झाल्यानंतर तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी तात्काळ मंडळ अधिकारी नजीर खुरेशी यांना या कार्यालयाचा पंचनामा करण्यास पाठविले. आडस रोडवर किरायाच्या जागेत असणाऱ्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला. या कार्यालयात वनक्षेत्र अधिकारी जे. आर. भांगे हे उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ कार्यालयाकडून आपणास कुठलेच साहित्य पुरविले नसल्याचे सांगण्यात आले. शेजारच्या शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित होतो, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मंडळ अधिकारी नजीर खुरेशी यांनी पंचानाम्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठिवला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण कार्यालयात ध्वजारोहण झालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST