बीड : पल्स पोलिओ मोहिमेत सर्व सरकारी लाभार्थी व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त खासगी लाभार्थी आहेत, अशा माजलगाव, बीड, अंबाजोगाई, परळी या चारच ठिकाणी दोन दिवस कोरोना लसीकरण केंद्रे राहणार आहेत. इतर पाच ठिकाणची केंद्रे बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. माजलगाव, बीड, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, धारूर, केज, गेवराई अशा ९ ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे सुरू केली. परंतु रविवारपासून पल्स पाेलिओ माेहीम सुरू झाली आहे. त्यामुळे या माेहिमेत आशाताई, अंगणवाडी सेविकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच व्यस्त राहणार आहेत. हाच धागा पकडून पाच केंद्रे बुधवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ माजलगाव, बीड, अंबाजोगाई, परळीतच लसीकरण केले जाणार आहे. सोमवार व बुधवारी खासगी आरोग्यकर्मींना अधिक प्राधान्य देऊन लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम यांनी याबाबत नियोजन केले आहे.
कोट
पल्स पोलिओ माेहिमेत सर्व सरकारी लाभार्थी व्यस्त राहतील. त्यामुळे बुधवारपर्यंत पाच केंद्रे बंद ठेवून केवळ माजलगाव, बीड, अंबाजोगाई, परळीतच कोरोना लसीकरण होईल. यात खासगी लाभार्थींना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.
- डाॅ. संजय कदम,
नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण, बीड