नितीन कांबळे
कडा : जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तयार केलेल्या ४७ शेततळ्यांचा निधी उपलब्ध झाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत . निधी खात्यावर त्वरित वर्ग झाला नाही तर कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शेत पिकवतांना अडचण येत असल्याने कृषी विभागाच्या माध्यमातून ८० शेतकरी यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सामूहिक शेततळे तयार केले. यासाठी ३४ बाय ३४ मीटर शेततळ्यासाठी ३ लाख २९ हजार, तर २४ बाय २४ मीटरसाठी १ लाख ७५ हजार रुपये अनुदान आहे. सुरवातीला पदरमोड करून शेततळे पूर्ण करून तसा अहवालदेखील कृषी विभागाला दिला आहे, पण दहा महिने होऊनही खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी उसनवारीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ८० पैकी ३३ शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत, तर ४७ शेतकरी आजही वंचित आहेत. गतवर्षी मार्चपासून लाॅकडाऊनमुळे तेव्हापासून आजपर्यंत १ कोटी २५ लाख रुपये निधी रखडला असून, तो हा निधी त्वरित लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा नसता उपोषणाला बसण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे.
● वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संबंधित लाभधारक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. वेळोवेळी होणाऱ्या बैठकीत हा विषय चर्चेला असतो. आमचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी लोकमतला सांगितले.