अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील विहिरी, विंधन विहिरी, पाझर तलाव व विविध जलस्रोत तुडुंब भरले. परिणामी रबी हंगाम मोठ्या प्रमाणात बहरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिकेही चांगली आली असून, परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसू लागले आहे. यावर्षी तरी समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
मास्क विसरले, चौकोनही पुसले
बीड : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर कमी राखले जावे, यासाठी दुकानांसमोर डिस्टन्स ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी चौकोन आखले होते. सामाजिक अंतर ठेवून ग्राहक या चौकाेनात उभे राहत होते. यामुळे गर्दी नियंत्रणात येऊन सामाजिक अंतराची अंमलबजावणी होत होती. मात्र, आता लोक मास्क वापरत नाहीत, तसेच अंतराचे चौकोनही पुसले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा दुकानांसमोर गर्दी वाढल्याचे दिसून येते.
वातावरणातील बदलामुळे भुर्दंड
माजलगाव : तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून दररोज ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारावी लागतात. या औषधांचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना होतो.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो. अन्यथा ते मास्क चढ्या भावाने विकले जातात. दोन पदरी आणि तीन पदरी मास्क दुप्पट भावाने विकले जात आहे.