त्यांना आता खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार असून त्यांची खाजगी बाजारात कमी भावात खरेदी करून लूट होत आहे. शेतकरी मात्र बेजार होऊन गेला आहे.
धारूर तालुक्यात सहा जिनिंगवर शासकीय कापूस खरेदी सुरू होती. यावर्षी राज्य पणन महासंघामार्फत ही खरेदी सुरू होती. एक जानेवारीपर्यंत सहा खरेदी केंद्रांवर २ लाख १० हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. बारा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शासकीय कापूस केंद्रावर कापूस घालण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंद केली आहे. यापैकी सात हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे माप झाले असून पाच हजारांपेक्षा जास्त शेतकरी अद्याप कापूस केंद्रावर घालण्यासाठी नंबरची वाट पाहत आहेत. पणन महासंघाने कापूस खरेदी जास्त झाल्याने व जिनिंगवर गाठी, रुई कापूस जास्त झाल्याचे कारण सांगत ४ जानेवारीपासून सर्व केंद्रांवरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे. यामुळे २ जानेवारीपासूनच हे खरेदी केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. हे खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार, यांची प्रतीक्षा करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत खाजगी बाजारात मातीमोल भावात कापूस विक्री करावा लागत आहे. यामुळे तात्काळ हे कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.