कोरोनाचा आकडा सातचा झाला सतरा
शिरूर कासार : तालुक्यात शुक्रवारी अवघे सात रुग्ण निघाले असल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी हा आकडा सतरा झाल्याने कोरोनाची आणखी दहशत कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला
शिरूर कासार : तालुक्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त केली जात असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
कीर्तनकार जगन्नाथ पाटील यांचा सत्कार
शिरूर कासार : प्रख्यात कीर्तनकार तथा प्रेममूर्ती संबोधले जाणारे जगन्नाथ पाटील महाराज यांनी तालुक्यातील तागडगाव येथील भगवान बाबा संस्थान व शिरूर येथील धाकटी अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानवर सदिच्छा भेट दिली. महंत स्वामी विवेकानंद शास्त्री व महंत अतुल महाराज शास्त्री यांनी पाटील महाराज यांचा सत्कार केला. यावेळी भागवताचार्य अशोक महाराज ईलग सोबत होते .
शाळेच्या वाटेवर शुकशुकाट
शिरूर कासार : शैक्षणिक वर्ष सुरू होताच येथील शाळा, महाविद्यालयाकडे जाणाऱ्या वाटा विद्यार्थी व त्यांच्या वाहनांच्या गर्दीने गजबजून जात असायच्या. मात्र, कोरोनामुळे शाळा सुरू आहेत, शिक्षक आहेत; पण वर्ग भरत नाहीत, त्यामुळे मुले नाहीत, अशी अवस्था असल्याने या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे .