आज लसीकरणाचा रंगीत तालीम : बीड, वडवणी, परळीतील पथकांना आधार
बीड : कोरोना लस देण्याच्या पार्शभूमिवर जिल्ह्यात बीड, परळी, वडवणीत शुक्रवारी रंगीत तालीम घेतली जाणार आहे. त्याच अनुषंगाने गुरूवारी सर्व अधिकाऱ्यांनी पथकांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले. यात घाबरून जाण्यासारखं काहीही नाही, गडबड करू नका, शांततेत नियोजन करूया असे म्हणत सर्व पथकांना आधार दिला.
मागील दहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना हा शब्द कानावर पडला तरी सर्वांच्या मनात भिती निर्माण होते. आतापर्यंत जिल्ह्यात १६ हजार ९९८ कोरोना रूग्ण आढळले आहेत. पैकी ५३९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही भिती वाढतच गेली. आता याच आजारावर कोवीशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्याला परवानगी मिळाली आहे. ती लवकरच येणार असल्याने आगोदर रंगीत तालीम घेतली जात आहे. शुक्रवारी बीड, परळी आणि वडवणीत ७५ आरोग्यकर्मिंना घेऊन ही मोहिम पार पडली जाणार आहे. याच अनुषंगाने गुरूवारी नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.बाबाासाहेब ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनी लस देणाऱ्या पथकांची भेट घेतली. त्यांना प्रशिक्षण देण्यासह आधार दिला. काही महिला कर्मचाऱ्यांच्या मनात याबद्दल भिती असल्याचे दिसले. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनीही याचा आढावा घेतला.