बीड : जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीसह इतर रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. जिल्हा रुग्णालयात तर केवळ ७८ पिशव्या शिल्लक असून, त्या केवळ दोन दिवस पुरतील, असे सांगण्यात आले. हा तुटवडा दूर करण्यासाठी दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे, तसेच बीड शहरात दोन व परळी येथे एक अशा तीन खाजगी पेढ्या आहेत; परंतु या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अगोदरच कोरोना सुरू झाल्यापासून लोक रक्तदान करण्यास आखडता हात घेत आहेत; परंतु शिवजयंतीनिमित्त शिवभक्त व संघटनांनी पुढाकार घेतल्याने रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला होता. नंतर आता लसीकरणाला सुरुवात झाली आणि पुन्हा रक्ताचा तुटवडा जाणवू लागला. नागरिकांनी, तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे. तसे आवाहनही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, विभाग प्रमुख डाॅ. जयश्री बांगर आदींनी केले आहे.
दररोज सरासरी ४० पिशव्यांची गरज
अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती आदी रुग्णांना रक्ताची जास्त गरज असते. जिल्हा रुग्णालयात व इतर अशा दररोज सरासरी ४० पेक्षा जास्त पिशव्यांची गरज भासते; परंतु आता तुटवडा असल्याने रक्तपेढीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
लस घेण्यापूर्वी करा रक्तदान
लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे दात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तदान करून लस घेतल्यास कसलाही त्रास होत नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
बी पॉझिटिव्हच्या शून्य पिशव्या
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत शनिवारी बी पॉझिटिव्ह गटाची एकही पिशवी शिल्लक नव्हती. त्यामुळे या गटाची मागणी आल्यास रक्तपुरवठा करायचा कोठून, असा प्रश्न रक्तपेढीसमोर होता. आलेल्या रुग्णांना खाजगी रक्तपेढीचा रस्ता दाखविला जात असला तरी तेथेही रक्त उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.
कोट
रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, तसेच संघटना, कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेऊन शिबिरे घ्यावीत. लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. लस घेतल्यानंतर २ महिने रक्तदान करता येत नाही. मनात गैरसमज न आणता सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे.
डॉ.जयश्री बांगर, रक्तपेढी प्रमुख, जिल्हा रुग्णालय, बीड
---
एकूण शासकीय रक्तपेढी २
खाजगी रक्तपेढी ३
--
जिल्हा रुग्णालयातील उपलब्ध रक्तसाठा
ए पॉझिटिव्ह ३२
ए निगेटिव्ह २
बी पॉझिटिव्ह २
बी निगेटिव्ह ४
ओ पॉझिटिव्ह २७
ओ निगेटिव्ह १
एबी पॉझिटिव्ह १०
एकूण रक्तपिशव्या ७८