बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अंशत: लॉकडाऊन घोषित केला होता. त्याची मुदत ४ एप्रिल रोजी संपली आहे. त्यानंतर राज्याचे निर्बंध मात्र लागू झाले असून, रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी, तसेच शिथिल काळात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पूर्वी लागू असलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे, तर राज्य शासनाच्या वतीने कडक निर्बंध घालण्यात आलेले आहे. यामध्ये सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत व्यवसायास व फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत कायम असणार आहेत.
चहा दुकाने, टपरीवर गर्दी दिसल्यास कारवाई
सार्वजनिक वाहतुकीसह चहाची दुकाने, टपऱ्या उघडता येणार आहेत. तसे असले तरी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असून, सहा फुटांचे अंतर ठेवून विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मास्क नसलेला ग्राहक तेथे आढळून आला, तर ५०० रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. पूर्वीच्या आदेशानुसार मॉल, सिनेमागृहे, बार, रेस्टॉरंट, सार्वजिक ठिकाणे बंदच राहणार आहेत. मात्र, हॉटेल व रेस्टॉरंटमधून सकाळी सात ते संध्याकाळी आठ या वेळेत पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे.
केवळ दहावी आणि बारावीच्या खासगी क्लासेसला ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. सूट असलेल्या कालावधीत नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सामाजिक अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासह इतर निर्बंधांचे पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
दर्शनासाठी वेळेची मर्यादा
परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर व अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी मंदिर सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व नियम पाळून दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
बसमध्ये ‘नो मास्क, नो एंट्री ’
सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात येत आहे. मात्र, मास्क असेल तरच बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असणे गरजेचे आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवास करणाऱ्या व्यक्तीस अँटिजन किंवा आरटीपीसीआर तपासणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. तरच बसने प्रवास करता येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
कोट
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करावे. निर्बंध कडक करण्यात आले आहेत, उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. -रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड