बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. शनिवारी तर जिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल झाले होते. केवळ १५ खाटा शिल्लक होत्या. खाटा रिकाम्या करण्यासाठी कमी लक्षणे असणारे व अतिगंभीर नसलेल्यांना सुटी दिली जात आहे, तसेच काहींना कोविड केअर सेंटरला पाठविले जात आहे, तसेच नव्याने ५० खाटा तयार करण्याच्या हालचालीही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात दररोज ७०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरोग्य संस्थांची संख्या कमी पडू लागली आहे. शासकीयसह खाजगी रुग्णालये रुग्णसंख्येने भरली आहेत. शनिवारी तर ४०० खाटांची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयात केवळ १५ खाटा रिक्त होत्या. त्यामुळे शनिवारी बाधित आढळलेल्या रुग्णांना ठेवायचे कोठे, हा प्रश्न होता. सामान्य रुग्णांना जिल्हा रुग्णालयाबाहेर प्रतीक्षाही करावी लागली होती, तर दुसऱ्या बाजूला ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशांना कोविड केअर सेंटरला हलविले जात होते, तसेच ज्यांना होम आयसोलेशन पाहिजे, त्यांना सुटीही दिली जात आहे. खाटा रिकाम्या करणे, हाच उद्देश सध्या आरोग्य विभागाचा आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडल्याने बाजूलाच असलेला डोळ्यांचा वॉर्ड व डायलिसिस वॉर्डमध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या तयार झालेल्या नव्हत्या. त्यामुळे सामान्य रुग्णांचे हाल झाले.
प्रशासन उपाययोजनांत अपयशी
मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यांना सुविधा देण्यासह उपचार करण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. अगदी चाचणी करण्यापासून ते रुग्णालयातून सुटी होईपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खाटा वाढविण्यासह औषधोपचारात गतिमानता आणावी, अशी मागणी सामान्यांमधून जोर धरत आहे.
खाजगीत अडवणूक
शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत असल्याने काही रुग्ण खाजगी कोविड सेंटरची पायरी चढत आहेत; परंतु येथेही त्यांना ॲडव्हान्स भरण्यासाठी अडवणूक केली जात आहे, तसेच खाटा मिळविण्यासाठी काही ठिकाणी विनंतीही करावी लागत आहे.
कोट
जिल्हा रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत असल्याने बाजूचा डोळ्यांचा आणि डायलिसिसचा वॉर्ड सुरू करीत आहोत. तो सुरू झाला की नाही, याची माहिती घेत आहे.
डाॅ. सूर्यकांंत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
----
जिल्ह्यातील एकूण आरोग्य संस्था ५९
शासकीय संस्था २०
खाजगी संस्था ३९
--
एकूण खाटांची क्षमता ५०५६
एकूण मंजूर खाटा ४७१६
रिकाम्या खाटा १४०७