धारूर : धारूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडूक झाली आहे. जहागीरमोहा ग्रामपंचायतीच्या तीन जागांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे, तर ३६ जागांसाठी ९८ उमेदवार रिंगणात आहेत. ५६ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून पाच ग्रामपंचायतींच्या ४६ जागांसाठी ही निवडणूक होती. १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी कोथिंबीरवाडी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाली, तर जहागीरमोहा ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी तीन जागा बिनविरोध आल्या. तालुक्यात ४६ पैकी दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर आता चार ग्रामपंचायतींच्या ३६ जागांसाठी निवडणूक होत असून ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज काढणीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ४३ उमेदवारांनी अर्ज परत घेतले. ५६ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. यामध्ये जहागीरमोहा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. राहिलेल्या सहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये आ. प्रकाश सोंळके समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी होणार, असे प्राथमिक चित्र दिसत आहे. रुईधारूर ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शोधात मात्र दमछाक झाली.
भाजपचे रमेशराव आडसकर समर्थक दोन गटांत विभागले असून येथील निवडणूक एकास एक चुरशीची होणार आहे. पक्ष न पाहता गावपातळीवरच ही निवडणूक होत आहे. भोपा ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक दोन गटांत ही निवडणूक होत आहे. कासारी ग्रामपंचायतीच्या अकरा जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून भाजपचे बाजार समितीचे सभापती महादेव बडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून भाजप व राष्ट्रवादी पॕॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.